जळगाव : देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद आज जळगावात उमटले. पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या महिला प्राध्यापिकेला अटक झाल्यानंतर या रॅकेटची सखोल चौकशी करण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या युवक संघटनांनी एम. जे. कॉलेजसमोर तीव्र आंदोलन छेडले.
बुधवारी सकाळी झालेल्या या आंदोलनात युवक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “१० रुपयांचे डायपरही लीक होत नाहीत, मग लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नपत्रिका कशा फुटतात?” असा सवाल करत आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेवर निशाणा साधला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने ‘फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा लिलाव’ करत संताप व्यक्त केला. “१६ लाख… २० लाख… २२ लाख…” अशा घोषणा देत नीट प्रश्नपत्रिकेची जाहीर बोली लावण्यात आली. या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पैशांच्या जोरावर होणाऱ्या गैरप्रकारांवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र टीका केली.
“शिक्षण आमच्या हक्काचे”, “केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा” अशा घोषणांनी एम. जे. कॉलेज परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत रामानंद नगर पोलीस ठाण्यात नेले.
हे आंदोलन महाविकास आघाडीच्या युवक संघटनांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी विविध युवक पदाधिकाऱ्यांसह अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.














Discussion about this post