चाळीसगाव । दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या कागदपत्रांची प्रमाणित नक्कल काढून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खाजगी इसमाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली आहे. सुनील शिवदास निकम उर्फ नाना (वय ४७, रा. आनंदवाडी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव असून, या कारवाईमुळे चाळीसगाव महसूल आणि नोंदणी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील तक्रारदार ३० एप्रिल रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता त्यांची ओळख सुनील निकम याच्याशी झाली. प्लॉट क्रमांक १२ (सर्वे नं. ४/१ व ४/२) या बिनशेती जमिनीच्या खरेदीखताची व सूची क्रमांक २ ची प्रमाणित नक्कल देण्यासाठी निकम याने तब्बल ९ हजार रुपयांची मागणी केली. यापैकी ५ हजार रुपये त्याने आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित ४ हजार रुपये नक्कल देताना द्यावे लागतील, असे सांगितले होते.
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), धुळे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. निकम याला उर्वरित ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला. दरम्यान, या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील लाचखोरीविरोधात कठोर संदेश गेला असून नागरिकांनी अशा प्रकारांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post