नंदूरबार । नंदूरबार जिल्ह्याला पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर येथील पोल्ट्री व्यवसाय कमालीचा संकटात सापडला आहे. राज्याच्या इतर भागांत या रोगाचा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली असून, गेल्या दोन दिवसांत तब्बल पावणे दोन लाख कोंबड्या ठार मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय सुमारे ८ लाख अंडी देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट करण्यात आली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने नवापूर तालुक्यात चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर तातडीने बंदी घातली आहे.
१ किलोमीटरचा परिसर सील; रात्रंदिवस मोहीम सुरू
नवापूर तालुक्यात एकूण ३८ पोल्ट्री फार्म्स असून, त्यापैकी २७ सध्या सुरू आहेत. या फार्म्समध्ये लाखो पक्षी आहेत. ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, त्याच्या १ किलोमीटर परिघातील सर्व पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
प्रशासकीय पथकांकडून केवळ दिवसाच नव्हे, तर रात्री उशिरापर्यंत कोंबड्या मारण्याचे आणि अंडी नष्ट करण्याचे काम सुरू आहे. एकट्या शनिवारीच ३३ हजार कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या. नियमानुसार पोल्ट्री फार्ममधील पक्षी, अंडी, त्यांचे खाद्य आणि पंख या सर्व गोष्टी नष्ट केल्या जात आहेत.
पशुसंवर्धन विभागाने ही मोहीम राबवण्यासाठी १०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिकहून विशेषज्ञांची एक टीम नवापूरमध्ये दाखल झाली आहे. सध्या संपूर्ण प्रभावित परिसर सील करण्यात आला असून डिसइन्फेक्शन, निरीक्षण, सर्वेक्षण आणि वाहतुकीवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रभावित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून कसून सर्वेक्षण केले जात आहे.
नवापूर नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण तालुक्यात अंडी, चिकन आणि बिर्याणी विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध घातला आहे. या निर्णयामुळे स्थानिक हॉटेल्स, चिकन सेंटर्स, अंडी विक्रेते आणि किरकोळ व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री उद्योगासोबतच संपूर्ण फूड चेनला मोठा आर्थिक फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नवापूर तालुका हा पोल्ट्री व्यवसायाचा मुख्य हब (मोठा बेल्ट) मानला जातो. मात्र, गेल्या १९ वर्षांत नवापूरला बर्ड फ्ल्यूचा हा तिसरा मोठा फटका बसला आहे.















Discussion about this post