जळगाव । गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत असलेल्या जळगावसह जिल्ह्यातील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. अवघ्या ४८ तासांत किमान तापमानात तब्बल ९ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे. २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान किमान तापमान ८ अंश सेल्सिअसच्या नीचांकी पातळीवर स्थिरावले होते. त्यानंतर तापमानात झपाट्याने वाढ झाली.
भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यानंतर मंगळवारी त्यात पुन्हा ३.८ अंशांची वाढ होऊन पारा थेट १७ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत किमान तापमानात झालेली ९ अंशांची वाढ हवामानातील मोठा बदल मानली जात आहे.
तापमानातील या वाढीमुळे सकाळच्या कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यातील किमान तापमान १४ ते १७ अंश, तर कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा उबदार वातावरण, तर रात्री हलकी थंडी असे संमिश्र वातावरण राहणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी काही भागांत हलके धुके पडण्याची शक्यता असून, सूर्य उगवल्यानंतर हे धुके लवकरच विरळ होईल. २८ नोव्हेंबरनंतर बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर आकाश पुन्हा निरभ्र होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.














Discussion about this post