जळगाव । कामाच्या शोधात जळगावहून गुजरातच्या सुरत जिल्ह्यात निघालेल्या एका कुटुंबासोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी पाटील कुटुंबाची गाडी अडवून कुटुंबातील सहा जणांना जबरदस्तीने खोल कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून, १३ वर्षीय मुलगा पाईपला पकडून राहिल्याने चमत्कारिकरीत्या बचावला आहे. तर अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजुरी करत होते. अधिक काम मिळविण्याच्या उद्देशाने ते २१ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह सुरतकडे निघाले होते. मात्र, उवा गावाजवळ दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांची गाडी अडवली आणि कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. यावेळी १३ वर्षीय मुलाने कालव्यातील पाईप घट्ट पकडून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तो बाहेर पडून जवळच्या हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याने घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ कालव्यात तीन मृतदेह आढळले. त्यात नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील, कविता पाटील आणि एका तरुणीचा समावेश आहे.
दरम्यान, प्रथमेश पाटील आणि हरीश पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता असून, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरत ग्रामीण पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली असून, संशयितांचा शोध सुरू केला आहे. पाटील कुटुंबाला नेमके कोणत्या कारणातून लक्ष्य करण्यात आले, आरोपींचा त्यांच्याशी काय संबंध होता आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.














Discussion about this post