पुणे । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून निकाल प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्डाचे अधिकृत प्रमाणपत्र वेगवेगळ्या वेळी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. नव्या व्यवस्थेनुसार ही दोन्ही कागदपत्रे एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आतापर्यंत निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणपत्रिका मिळत असे, तर अंतिम प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकदा काही महिने थांबावे लागत होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मंडळाने प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
नव्या प्रणालीत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संयुक्त दस्तावेजावर विद्यार्थ्याचा फोटो आणि QR कोड समाविष्ट करण्यात येणार आहे. या QR कोडच्या माध्यमातून संबंधित शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालये कागदपत्रांची सत्यता त्वरित पडताळू शकतील. त्यामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच, विद्यार्थ्यांचे नाव आधारकार्डनुसार छापले जाणार असल्याने माहितीतील चुका कमी होण्यास मदत होणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल आणि बनावट कागदपत्रांवरही आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. आगामी निकालापासून ही नवी व्यवस्था लागू होणार असून यंदाच्या विद्यार्थ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.















Discussion about this post