नागपूर । मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेत्याची हत्या करण्यात आलीय. प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री असं हत्या झालेल्याचं नाव असून एका कुख्यात गुन्हेगाराने किरकोळ वादातून ही निर्घृण हत्या केली. या घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली.
पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रियांशु हा मेकोसाबागचा रहिवासी होता आणि ध्रुव साहू नारा येथील रहिवासी होता. दोघांवरही चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या रात्री ध्रुव प्रियांशुला त्याच्या घरातून घेऊन गेला आणि नारा येथील ओम साई नगरी जवळ दोघे बसले. तिथे त्यांनी दारू आणि गांजा सेवन केले.
दारू पिऊन त्यांच्यात काहीतरी वाद झाला. प्रियांशु सुरुवातीला ध्रुवला चाकूने धमकावत होता, त्यानंतर ध्रुव चाकू घेऊन गेला. काही वेळानंतर वाद वाढला आणि रागाच्या भरात ध्रुवने प्रियांशुवर चाकूने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांशु अर्धनग्न अवस्थेत आढळला, त्याच्या अंगावर प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती. पोलिसांच्या पथकाने जखमी प्रियांशुला ताबडतोब मेयो रुग्णालयात नेले, जिथे तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी ध्रुव साहूला ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांनुसार, मृत प्रियांशुवर चोरी, घरफोडी आणि मारहाणीचे १५ गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी ध्रुववरही पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि हत्येमागील खरा हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.















Discussion about this post