मुंबई । राज्यातील काही ठिकाणी परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह घरांचं, जनावरांचं मोठं नुकसान झाले. अतिपावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक पोषक ठरल्याने राज्यात आज २६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भ या भागांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः २७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज कोकण किनारपट्टी (ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा (पुणे, सातारा, कोल्हापूर), मराठवाडा (धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड) आणि विदर्भातील (बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर) या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या सर्व भागांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे.
तसेच २७ आणि २८ सप्टेंबर रोजी येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतातून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) काही राज्यांतून माघार घेतली आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्लीसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. मात्र, महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.















Discussion about this post