नाशिक । महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून नव्या सरकारमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहे. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून आता नुकतंच छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केले आहे.
“राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मी पुढचा विचार करेन. लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठेही वातावरण बिघडू नका मी सांगितले. मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
“प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे. मला त्यांनीच लोकसभेत उभे राहा असे सांगितलं होतं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. सगळी तयारी झाली. सर्व लोक आले. जर त्यांना मला उभं करायचं होतं, तर मग त्यांनी नाव जाहीर करायला हवं होतं. आठ दिवस झाले, पंधरा दिवस झाले तरी अद्याप माझे नाव जाहीर झाले नाही. त्यासाठी त्यांनी एक महिना लावला. मग मीच म्हटलं मी माघार घेतो. कारण अशाप्रकारे आस लावून बसणं योग्य नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.















Discussion about this post