जळगाव । राज्य शासनाने ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजार ६७० कोटी रुपये जमा केले असून यात जळगाव जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी सात लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर ही रक्कम मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याचे ऑगस्टमध्ये शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले नव्हते. शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची संधी १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दिली होती.
या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६ कोटी ७० लाखांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होणार आहे.
या योजनेत राज्यात २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीककर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे, अशा एकूण १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत एकूण पाच हजार ३१० कोटींचा लाभ देण्यात आला आहे.















Discussion about this post