गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. दोन भावंडाचा तापामुळे मृत्यू झाला. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचा आटापिटा करणाऱ्या आई-वडीलांच्या खांद्यावर दोघांची मृतदेह गेली. या दोघांना 15 किमीची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. बाजीराव रमेश वेलादी (वय ६) व दिनेश रमेश वेलादी (वय साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा) अशी मृत झालेल्या भावंडांची नावे आहेत.
हा सगळा प्रकार गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडला आहे. मृतदेह खांद्यावर नेतानाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल होताच हळहळ व्यक्त होत आहे. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. दरम्यान ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान काही वेळाने सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास दिनेशचाही मृत्यू झाला.
जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई- वडिलांनी नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढली. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. १५ किलोमीटर पायपीट केल्यानंतर नातेवाईकाची दुचाकी बोलावून पत्तीगावला पोहोचले.
एकीकडे आपण देशाच्या अमृत महोत्सव साजरा करीत असून या गंभीर प्रकरणावर जिल्हा परिषदेचा कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post