धुळे : मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात अवैधरीत्या होत असलेली दारूची तस्करी शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने रोखली आहे. गुरुवारी वरला ते आंबा-खंबाळे रस्त्यावर नाकेबंदी लावत ही कारवाई केली. चालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख ८३ हजार १२० रुपये किमतीच्या बिअर आणि ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा सुमारे ५ लाख ३३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात अवैधरीत्या दारू तस्करी होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार वरला ते आंबा-खंबाळे रस्त्यावर कैलास जाधव, बिपीन येवलेकर, नेरकर, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा आदींच्या पथकाने नाकाबंदी केली. यावेळी (एमएच २९ जे ०२६१) या वाहनाचा चालक राम बाबू भिल (५५, रा. पळासनेर) याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे हे वाहन पोलिस ठाण्यात नेत तपासणी केली असता बिअरचे ७० खोके सापडले. चालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख ८३ हजार १२० रुपये किमतीच्या बिअर आणि ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा सुमारे ५ लाख ३३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी स्वागत केले.















Discussion about this post