नवी दिल्ली । दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान विविध नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतात सध्या ‘अघोषित आणीबाणी’सदृश परिस्थिती असल्याचा दावा करत त्यांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. उद्यापर्यंत या नेत्यांची सुटका झाली नाही, तर आपण उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा विचार करू, असा इशाराही वांगचुक यांनी दिला आहे.

सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक दिवस आधीच शांतता आणि एकजूट राखण्याचे आवाहन केले होते. मात्र, आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेल्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याचे समजल्यानंतर त्यांनी चिंता व्यक्त केली.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल, असे आपल्याला वाटले नव्हते, असे वांगचुक यांनी म्हटले. देशात आणीबाणी अधिकृतपणे घोषित केलेली नसली, तरी परिस्थिती आणीबाणीसारखी असल्याची भावना निर्माण होत असल्याने त्यांनी याला ‘अघोषित आणीबाणी’ असे संबोधले.
CJP आंदोलनाशी संबंधित अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या सर्वांची लवकरात लवकर सुटका होईल, अशी अपेक्षा वांगचुक यांनी व्यक्त केली. मात्र, उद्यापर्यंत नेत्यांची सुटका झाली नाही, तर उपोषण किंवा पदयात्रेच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याचा विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.














Discussion about this post