मुंबई । राज्याचा कारभार जेथून चालतो, त्या मुंबईतील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या ‘मंत्रालय’ इमारतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून चक्क ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे मंत्रालयातील कडक सुरक्षा व्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नियमांनुसार, मंत्रालयात प्रवेश करताना सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे कडक नियम असतानाही, मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यालयात तब्बल ८० हजार रुपयांची रोख रक्कम आली कशी? आणि ती तिथे का ठेवली होती? असा अत्यंत गंभीर प्रश्न आता या चोरीच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयातून ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे समजताच मंत्रालयात एकच खळबळ उडाली. हा प्रकार बाहेर येऊ नये आणि मीडियामध्ये याची वाच्यता होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संशयावरून कार्यालयातील कर्मचारी आणि तिथे ये-जा करणाऱ्या इतर विभागातील कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट) कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत कसून झाडाझडती घेण्यात आली आहे.
मंत्रालयातील कार्यालये चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच, अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क आणि त्यांच्या पीए (PA) वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. मेडिकल दुकानदाराकडून औषध विक्रीच्या परवान्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा दावा करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच, आता थेट मंत्र्यांच्या दालनातून रोकड चोरीला गेल्याने मंत्रालयाच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.














Discussion about this post