मुंबई । विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू असतानाच, पूर्व विदर्भातून काँग्रेससाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे तब्बल २३ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. या मोठ्या राजकीय भूकंपाला स्वतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
काँग्रेसचे नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. सुरुवातीला काँग्रेसने हा दावा फेटाळला होता, मात्र आता स्वतः विजय वडेट्टीवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वडेट्टीवार म्हणाले, “चंद्रपुरात सध्या घोडेबाजार जोरात सुरू आहे. आमचे जवळपास २३ नगरसेवक सध्या संपर्क क्षेत्राबाहेर (नॉट रिचेबल) आहेत. त्यांना प्रत्येकी ५-५ लाख रुपये देऊन अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहे.” राजकीय वर्तुळात तर एका एका मतासाठी तब्बल १० लाखांपर्यंतचा व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
आपलेच लोक पैशाच्या आमिषाला बळी पडल्याने वडेट्टीवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. यावर आक्रमक पाऊल उचलत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. “पैशाने आमचे लोक विकले गेले आहेत, हे दुर्दैवी आहे. आता आम्ही या सर्व नगरसेवकांसाठी अधिकृत ‘व्हीप’ जारी करणार आहोत. ते संपर्कात नसल्याने हा व्हीप थेट त्यांच्या घरांवर चिकटवला जाईल. जर त्यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केले, तर त्यांना तातडीने अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” असा सज्जड दम वडेट्टीवारांनी दिला आहे.















Discussion about this post