पुणे । कोथरूड परिसरातील विकासकामांवरून मंत्री आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित आता पोलिसांच्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे १ वाजता त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ही कारवाई करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत संतोष पंडित यांनी आपल्या युट्युब अकाउंटवरून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमधून बदनामीकारक तसेच अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. याप्रकरणी सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे पथक संतोष पंडित यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ७५(१)(iv), ७५(३), ३५६(२) आणि ३५२, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संतोष पंडित हे कोथरूडमधील विविध विकासकामांवरून सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते. नुकतेच त्यांनी कारच्या नंबर प्लेटच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी झालेल्या अटकेमुळे पुण्यात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्याकडे सोपवण्यात आला असून, संबंधित व्हिडिओ आणि त्यातील मजकुराची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तपासातून या प्रकरणात आणखी काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे















Discussion about this post