जळगाव । राज्यात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मान्सूनची चाहूल नसली तरी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही उन्हाचा तडाखा आणि कोरडे हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पुढील ५ दिवस अतिशय महत्त्वाचे असून काही ठिकाणी वादळी पाऊस, तर काही भागात कडाक्याचे ऊन पाहायला मिळणार आहे.
कोकण, पुणे आणि कोल्हापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या भागांत पुढील पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांत जळगावात तापमानाने ४३ ते ४५ अंशांचा टप्पा ओलांडला असून, उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी वातावरण ढगाळ असले तरी तापमान ४३ अंशावर असल्याने उकाडा कायम आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
हवामानातील या बदलांमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून, पुढील काही दिवस राज्यातील वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.















Discussion about this post