मुंबई । मराठी लोककला, लावणी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती सुनेने दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वासह लोककलेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

लावणीच्या रंगमंचापासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि लोकनृत्याच्या प्रभावी सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रंगमंचावर लावणी सादर करत असताना एकदा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. या घटनेनंतर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या.
१०० हून अधिक चित्रपटांत अभिनयाचा ठसा
मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले. १०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सहजसुंदर अभिनय, लावणीतील अदाकारी आणि प्रभावी हावभाव ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये होती.
१९७७ मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्ली येथे नृत्यनाट्य सादर केले. लावणी आणि लोककलेला महाराष्ट्राबाहेरही ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले.‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस येथेही झाले. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचे प्रशिक्षण दिले आणि लोककलेचा वारसा पुढे नेण्यासाठी योगदान दिले.
चार दशकांहून अधिक काळ आपल्या कलेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे पर्व संपले आहे. त्यांच्या अभिनयाचा आणि लावणीतील योगदानाचा ठसा रसिकांच्या स्मरणात कायम राहील.















Discussion about this post