पुणे । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अकराव्या दिवशी यशस्वी तोडगा मिळाला. आमदार रोहित पवार यांच्यासह काही नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला होता. दरम्यान, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर मध्यस्थीची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या प्रयत्नांनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन अकरा दिवसांपासून सुरू असल्याने त्यावर तोडगा काढण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून आंदोलन संपवण्यासाठी सरकारकडून मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सोपवली.

शिवेंद्रराजे हे शांत आणि संयमी स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संयम राखणे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणे, या दृष्टिकोनातून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. राज्य सरकारचा प्रस्ताव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची भूमिका त्यांनी बजावली.
गिरीश महाजनांनंतर शिवेंद्रराजे संकटमोचक?
राज्यातील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनेकदा मध्यस्थीची जबाबदारी सोपवली जात होती. आता एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चर्चेचा विषय ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले असले, तरी यावरून त्यांनी गिरीश महाजन यांची जागा घेतली, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र, संवेदनशील प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यासाठी शिवेंद्रराजे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याने राज्य सरकारच्या राजकीय व्यवस्थापनात त्यांची भूमिका चर्चेत आली आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर पुढे कोणते निर्णय घेतले जातात आणि आयोगाच्या कामकाजाबाबत त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.















Discussion about this post