मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या प्रकरणाचा निकाल लागण्यास आणखी वेळ लागणार असेल, तर हे निवडणूक चिन्ह तात्काळ गोठवण्यात यावे, अशी मागणी ठाकरेंनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सध्या शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंनी निकालास होणाऱ्या विलंबावर प्रश्न उपस्थित केला.
“या खटल्याला चार वर्षे झाली आहेत. या काळात अनेक निवडणुका पार पडल्या. तरीही प्रकरणाचा अंतिम निकाल झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही कारणाने निकालाला आणखी वेळ लागणार असेल, तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाकावे,” अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

‘आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळायला हवे’
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळायला हवे, अशी भूमिका पुन्हा स्पष्ट केली. आपल्याकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह बोगस पद्धतीने काढून घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर करून सत्ता मिळवण्यात आली आणि त्यानंतर गैरकारभार करण्यात आला, असा आरोप ठाकरेंनी केला. त्यामुळे या चिन्हाचा दुरुपयोग रोखण्यासाठी योग्य ती कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सण-उत्सवातील डीजेच्या गोंगाटावरही भाष्य
दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात होणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. प्रत्येकाला सण आणि उत्सव हवेत, मात्र कोणालाही अनावश्यक गोंगाट नको, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ डीजेच्या गोंगाटाविरोधातील भूमिकेला पाठिंबा म्हणून घेतला जात आहे.

महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो नको
महापुरुषांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो लावण्याच्या मुद्द्यावरही ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत महापुरुषांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो नको, असे त्यांनी म्हटले. या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या मागणीमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.















Discussion about this post