रावेर । रावेर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील विविध मोजणी प्रकरणांमध्ये झालेला विलंब, कामकाजातील अनियमितता आणि कर्तव्यातील कसूर याबाबत प्राप्त तक्रारींची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. विभागीय स्तरावर झालेल्या या चौकशीत दोष आढळून आल्याने रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी सहाय्यक संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, नाशिक यांच्याकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. रेकॉर्ड प्रमुख धनराज लहरीया आणि भूमापक अमोल पालवे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांच्या मोजणी प्रकरणांमध्ये होणारा विलंब आणि कार्यालयीन कामकाजाबाबतच्या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी या प्रकरणाचा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनाने तक्रारींची दखल घेत चौकशी सुरू केली.
गत आठवड्यात नाशिक येथील सहाय्यक संचालक सागरे यांनी रावेर भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देऊन कार्यालयीन कामकाजाची तपासणी केली. यावेळी विविध मोजणी प्रकरणे, रेकॉर्ड तसेच संबंधित कामकाजाची पाहणी करण्यात आली.
या तपासणीत रेकॉर्ड प्रमुख धनराज लहरीया आणि भूमापक अमोल पालवे यांच्या कामात दिरंगाई तसेच कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळून आल्याचे प्रशासनाच्या चौकशीत समोर आले. त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मोजणी प्रकरणे वेळेत निकाली काढण्याबाबत प्रशासनाकडून पुढील काळात अधिक दक्षता घेतली जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.















Discussion about this post