चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील एका मंगल कार्यालयातील महिला स्वच्छतागृहात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत दोघा संशयितांना अटक केली असून, एका महिलेसह तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही दुर्घटनेची घटना घडली. संशयित महिलेने पीडित अल्पवयीन मुलीला बळजबरीने व धमकावत मंगल कार्यालयातील महिला स्वच्छतागृहात नेले. तेथे दोन पुरुष संशयितांनी तिच्यावर अत्याचार केला. या संपूर्ण कृत्यादरम्यान संशयित महिलेने पीडितेला विरोध करू न देता उलट धमकावल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतरही पीडितेला सातत्याने धमकावण्याचे प्रकार सुरूच ठेवण्यात आले होते.
पोलिसांची धडक कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या राहुल अशोक (पूर्ण नाव माहिती नाही) आणि आर्य (पूर्ण नाव माहिती नाही) या दोन मुख्य संशयितांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेली श्रद्धा (पूर्ण नाव माहीत नाही, रा. चाळीसगाव) ही महिलादेखील संशयित असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.















Discussion about this post