जळगाव । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-म्हसावद रेल्वे मार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी उद्या म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, सहा मेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच १९ एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर तीन तासांपर्यंत थांबविण्यात येणार आहेत.
ब्लॉकपूर्वी ७ सप्टेंबर रोजी प्री-नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ सप्टेंबरला मुख्य कामासाठी १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
या गाड्या रद्द
११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू
१११२० भुसावळ-इगतपुरी मेमू
११११३ भुसावळ-देवळाली मेमू
११११४ देवळाली-भुसावळ मेमू
६११२९ नाशिक रोड-बडनेरा मेमू
६११३० बडनेरा-नाशिक रोड मेमू
वंदे भारत, दादर एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल
ब्लॉकचा परिणाम काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही होणार आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (२६१०२) ही गाडी ८ सप्टेंबरला अजनीहून नेहमीच्या सकाळी ९.५० वाजता न सुटता तीन तास उशिराने दुपारी १२.५० वाजता रवाना होईल.
त्याचप्रमाणे भुसावळ-दादर एक्स्प्रेस (१९००४) ही गाडी भुसावळहून सायंकाळी ५.४० ऐवजी एक तास उशिराने सायंकाळी ६.४० वाजता सुटणार आहे.
८ सप्टेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाडीचे लाईव्ह रनिंग स्टेटस आणि सुधारित वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे. शक्य असल्यास अत्यावश्यक नसलेला प्रवास पुढे ढकलावा किंवा पर्यायी वाहतुकीचा विचार करावा. ब्लॉकमुळे काही गाड्यांना विलंब होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करणे गरजेचे आहे.















Discussion about this post