गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. वसतिगृहातील खोलीत विषारी साप शिरल्यानंतर काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका खोलीत साप शिरला. यावेळी खोलीत सुमारे ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. अचानक साप आल्याने विद्यार्थिनींमध्ये घबराट निर्माण झाली. याचदरम्यान काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दीपिका इतवा लकडा (इयत्ता सहावी), सुष्मिता सरोजीत मंडल (इयत्ता आठवी) आणि अनु गाजुर कोरेटी (इयत्ता दुसरी) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही आश्रमशाळा गडचिरोली आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चालविली जाते. विद्यार्थिनींना सर्पदंश नेमका कोणत्या परिस्थितीत झाला आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी किती वेळेत हलवण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर आश्रमशाळेतील वसतिगृहांची सुरक्षा, स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी व्यवस्था आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















Discussion about this post