जळगाव । जळगाव जिल्ह्यात हवेतील आर्द्रता कायम असल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशातच आज, सोमवारी (दि. १० ऑगस्ट) दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जळगावकरांना पुन्हा एकदा पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दिवसभर उकाडा अन् आकाश ढगाळ
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उसंती घेतली आहे.त्यातच उकाडा वाढला आहे. रविवारी जळगाव शहराचे कमाल तापमान ३१.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळच्या वेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ९१ टक्के, तर सायंकाळी ६६ टक्के इतके होते. जास्त आर्द्रतेमुळे दिवसभर नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. त्यातच दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने पावसाचे सावट निर्माण झाले होते.
१५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाचे सावट
हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील सात दिवसांच्या अंदाजानुसार, आज दि. १० ऑगस्ट रोजी दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यानंतर ११ ते १५ ऑगस्टदरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच स्वातंत्र्यदिनापर्यंत जिल्ह्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.















Discussion about this post