मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन टायगर पार्ट-2’ सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांना आपल्या गटात आणत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटातील आमदार शिंदे यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे गटाच्या एकूण २० आमदारांपैकी तब्बल १४ आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या आमदारांना आपल्या गटात आणण्यासाठी शिंदे यांनी तीन मंत्र्यांवर जबाबदारी सोपवल्याचीही चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज दुपारी २ वाजता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नसून राखीव स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली दौऱ्यात शिंदे नेमकी कोणाची भेट घेणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे आजच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार नसून ते थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. २ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर पुन्हा सुनावणी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्ली दौऱ्यात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीमसोबत तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर पार्ट-2’च्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार खरोखरच शिंदे यांच्या संपर्कात आहेत का आणि या चर्चांना पुढील काळात प्रत्यक्ष राजकीय घडामोडींचे स्वरूप येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post