मुंबई । यंदाच्या मान्सूनचा ऋतू सुरू झाल्यापासून हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी एकट्या जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे ती तूर भरून निघाली आणि धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली. मात्र, ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यातही राज्यात अपेक्षित पाऊस होण्याची शक्यता कमी असून, यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर यावर्षी दुष्काळाचे सावट असून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर अद्यापही समाधानकारक पाऊस कोसळलेला नाही.
१ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजामुळे राज्यातील काही भागात दुष्काळाचे थेट संकेत मिळत आहेत. यात प्रामुख्याने बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
एल निनोचा फटका आणि पिके धोक्यात
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चे संकट असणार असल्याचे सुरुवातीपासूनच सांगितले जात होते. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याचे दिसून येत आहे. इतर राज्यांमध्येही पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पावसाअभावी राज्यातील उभी पिके धोक्यात आली असून, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. धरणांची स्थिती बरी असली तरी पावसाच्या अभावामुळे भविष्यातील पाणीसाठ्यावर आणि शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.














Discussion about this post