जळगाव । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकावर विकासात्मक कामांना वेग आला असून, ५ व्या रेल्वे मार्गाच्या (5th Line Connectivity) महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या कामामुळे २३ आणि भुसावळ २४ सप्टेंबर २०२६ रोजी या मार्गावरील तब्बल १२ महत्त्वाच्या रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. या अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातील दैनिक प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

नेमके तांत्रिक काम काय?
जळगाव ते भुसावळ दरम्यान ५ व्या रेल्वे लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे नवीन काम मुख्य रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी (कनेक्टिव्हिटीसाठी) हा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने आधीच गाड्यांची यादी जाहीर केली आहे.

रद्द केलेल्या गाड्यांची सविस्तर यादी:
२३ सप्टेंबर रोजी रद्द गाड्या:
सुरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००७)
उधना-भुसावळ मेमू (१९१०५)
भुसावळ-उधना मेमू (१९१०६)
भुसावळ-देवळाली मेमू (११११४)
बडनेरा-नाशिक रोड मेमू (६११३०)
२४ सप्टेंबर रोजी रद्द गाड्या:
भुसावळ-सुरत एक्सप्रेस (१९००८)
नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर (५९०७५)
भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (५९०७६)
इगतपुरी-भुसावळ मेमू (११११९)
भुसावळ-इगतपुरी मेमू (१११२०)
देवळाली-भुसावळ मेमू (११११३)
नाशिक रोड-बडनेरा मेमू (६११२९)
या रेल्वे मार्गावरून दररोज हजारो नोकरदार, व्यावसायिक आणि शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी प्रवास करतात. सलग दोन दिवस मेमू आणि पॅसेंजर गाड्या रद्द राहिल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा किंवा इतर वाहनांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














Discussion about this post