जळगाव | जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘माहितीचा अधिकार दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ अन्वये सार्वजनिक प्राधिकरणांनी निर्धारित माहिती जनतेसमोर प्रकट करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक प्राधिकरणांची कार्ययंत्रणा अधिक पारदर्शक बनविण्यासाठी तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत व्यक्तीगत अर्ज करण्याची गरज कमी करण्यासाठी वेबसाईटवर माहिती प्रकट करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीच्या अधिकारावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येणार असून स्पर्धा आधी घेण्यात येऊन त्यांचे निकाल २८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजकार्यकर्ते व इच्छुक गटांसाठी भिंतीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लॉयन्स क्लब, रोटरी क्लब तसेच विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.














Discussion about this post