जळगाव | राज्यात दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेत इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी तसेच इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेले व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे सन २०२६-२७ मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थी (अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र, इमाव व एसईबीसी) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.

या अभियानात सीईटी, नीट, गेट इत्यादी परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच डिप्लोमा/डी-फार्मसी तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात येणार आहेत. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा जात पडताळणी कार्यालयस्तरावर दि. २४ ते २५ सप्टेंबर २०२६, दि. ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ आणि दि. १४ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्रुटी पूर्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी तसेच सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी केले आहे.














Discussion about this post