नंदुरबार । नंदुरबार शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्यासह तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत चौधरी, दिलीप राठोड आणि विजय कोठारी या तिन्ही आरोपींना अटक केली असून, या कारवाईमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दिलीप राठोड याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. नंदुरबार येथील ‘एकरूप हॉटेल’मध्ये तिच्यावर हा अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे हॉटेल भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी (उर्फ पिंटू) यांच्या मालकीचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, प्रशांत चौधरी आणि विजय कोठारी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

पोलिसांची कारवाई
सुरुवातीला याप्रकरणी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास नंदुरबार तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. नंदुरबार पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून, तक्रार, जबाब आणि पुराव्यांच्या तपासातून या प्रकरणातील नेमके सत्य समोर येणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरच अशाप्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.















Discussion about this post