जळगाव । जळगाव महापालिकेच्या एका महत्त्वाच्या महासभेत चक्क एका नगरसेवकाने कमरेला पिस्तूल लावून उपस्थिती लावली असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात एकच चर्चा रंगली असून, सभागृहाच्या सुरक्षेवर आणि प्रवेश नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महासभेसारख्या लोकप्रतिनिधींच्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या बैठकीत अशा प्रकारे शस्त्र घेऊन प्रवेश करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. परवानाधारक शस्त्र असले तरीही ते शासकीय किंवा महापालिकेच्या सभागृहात बाळगता येते का, याबद्दल कायदेशीर नियम काय सांगतात, याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

आयुक्तांची स्पष्ट भूमिका
या संपूर्ण प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा प्रकार आपल्या स्वतःच्या निदर्शनास आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास आणि संबंधित व्हिडिओ किंवा पुरावे सादर झाल्यास शस्त्र अधिनियम (Arms Act), शासनाचे नियम आणि महापालिका कायद्यातील तरतुदींची कसून तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान, संबंधित नगरसेवकाकडे या पिस्तूलचा कायदेशीर परवाना असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, परवाना असला तरी सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः महापालिकेच्या सभागृहात शस्त्र घेऊन जाण्यास कायदेशीर परवानगी आहे का? हा या प्रकरणातील कळीचा मुद्दा ठरणार आहे.सध्या या धक्कादायक प्रकारामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड झाला असून, प्रशासन यावर नेमकी काय कठोर भूमिका घेते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post