मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात आज, मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजताच्या सुमारास या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार असून, आतापर्यंतच्या सुनावणीत त्यांनी संघटनात्मक नियम, पक्षाची घटना आणि पक्षातील नेतृत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला आहे.
कपिल सिब्बल यांनी विविध राजकीय पक्षांचे संदर्भ देत शिवसेनेतील संघटनात्मक रचना आणि पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. पक्षातील सर्वोच्च पद उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचा दावा करत त्यांनी संघटना कोणाच्या बाजूने आहे, यावरही युक्तिवाद केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वीच शिंदे गटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल आणि संख्याबळ आपल्याकडे अधिक असल्याने आपली बाजू मांडल्यानंतर विरोधकांची बोलती बंद होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
तसेच, सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर लक्ष न देता आपल्या विभागात जोमाने काम करण्याचे निर्देश शिंदे यांनी नेत्यांना दिले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यानंतर शिंदे सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. मंत्रालयातील शिंदे यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. त्यामुळे एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि दुसरीकडे शिंदे गटातील राजकीय हालचाली यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.















Discussion about this post