मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामासोबत सीतामाई का नाही? असा सवाल केला. मात्र यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं असून मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदीच नव्हे तर अमित शाह आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे.
मला एका सभेत प्रश्न विचारण्यात आला, रामाची मूर्ती बसवली पण सीतेची का नाही? मी मोदींना प्रश्न विचारला असता पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे, असा चिमटा शरद पवार यांनी काढला. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरही त्यांनी टीका केली. मला भाजपचा हा नारा चुकीचा वाटतो. लोकसभेची संख्या 543 सांगितली तर मी खरी मानणार, असं शरद पवार म्हणाले. दहा वर्षात शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. त्यालाही पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. मी 10 वर्ष सत्तेत नव्हतो. सत्तेत ते होते. 10 वर्षात त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. माझ्याकडे शेती खातं होतं तेव्हा मी काय केलं हे जगाला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवार हे भाजपसोबत जाण्यास अनुकूल होते, असं अजित पवार यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे. अजितदादांच्या या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला आमची संमती नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.















Discussion about this post