नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. या भेटीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. भेटीनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या भेटीचे चार फोटो शेअर करत भेटीची माहिती दिली.
विद्यार्थी आंदोलनावर चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत शरद पवार यांनी जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. आंदोलनामागील कारणे, विद्यार्थ्यांच्या मागण्या तसेच पेपरफुटीच्या घटनांबाबत उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पवार यांनी संबंधित निवेदनही पंतप्रधानांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
मोदींनी शेअर केले भेटीचे फोटो
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर भेटीचे चार फोटो शेअर केले. एका छायाचित्रात शरद पवार पंतप्रधानांना काही कागदपत्रे देताना दिसत आहेत, तर अन्य छायाचित्रांमध्ये दोन्ही नेते विविध मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीत उपस्थित असल्याचे फोटोंमधून स्पष्ट होते.
काल जंतरमंतरवर आंदोलनकर्त्यांची घेतली होती भेट
या भेटीपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीनंतर शरद पवार माध्यमांशी संवाद साधून चर्चेतील मुद्द्यांची माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि देशभर चर्चेत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post