कोल्हापूर: “रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही,” असा अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आज कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ऐतिहासिक महामोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात तीव्र रणशिंग फुकले आहे.
आज सकाळी कोल्हापुरातील दसरा चौक येथून या महामोर्चाला जोरदार सुरुवात झाली. या मोर्चाचे थेट नेतृत्व नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी या मोर्चात हिरीरीने सहभागी झाले होते.
शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक जमिनी धोक्यात येणार असल्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी यात सहभागी झाले आहेत. जमिनी वाचवण्यासाठी महिला शेतकऱ्यांनीही या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाचा निषेध केला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा जनसागर पाहायला मिळत होता.
शेतकऱ्यांचा तीव्र संताप; मागण्यांचे निवेदन सादर
आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण कोल्हापूर शहर दणाणून सोडले होते. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असून तो कोणत्याही परिस्थितीत राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा नेत्यांनी आपल्या भाषणातून सरकारला दिला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर शेतकऱ्यांच्या आणि नेत्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, सरकारने यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.















Discussion about this post