जळगाव : पाळधी ते तरसोददरम्यानच्या बायपासवर अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरात या मार्गावरील अपघातांमध्ये तब्बल चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याने गेल्या महिनाभरापासून बायपासवरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी वाढली असून, वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
बायपासवरील वाहतूक शहरातून वळविल्यानंतर वाढलेल्या वाहनांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. यामुळे गेल्या महिनाभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये चार जणांना जीव गमवावा लागला.
या प्रकरणी ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंगल, जीएम दत्ता यांच्यासह संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. बायपासवरील परिस्थितीची योग्य दखल न घेणे आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी न घेणे यामुळेच अपघातांना चालना मिळाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
बायपासवरील वाहतूक बंद करून ती शहरातून वळविल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत असतानाच आता संबंधित ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. पुढील तपासात अपघातांसाठी नेमकी कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे आता लक्ष लागले आहे














Discussion about this post