मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लातूरमधील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या ट्रेनिंग सेंटरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आल्यानंतरही मंत्र्यांनी पैसे घेतल्याशिवाय काम करणार नसल्याचा हट्ट धरल्याचा दावा राऊत यांनी केला. यावरून त्यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
खासदार संजय राऊत सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. राज्यातील प्रशासन आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल ठरत असून, एका बाजूला दुष्काळाची झळ आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची होरपळ नागरिकांना सहन करावी लागत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
२५ कोटींच्या प्रकल्पासाठी ५ कोटींची मागणी?
या आरोपाची पार्श्वभूमी सांगताना राऊत म्हणाले की, लातूरमधील मातंग समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या या केंद्रातून दलित आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता.
या प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही उदगीरकर यांना वारंवार मंत्रालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. मंत्र्यांना भेटल्याशिवाय काम होणार नसल्याचे ओएसडी सिद्धार्थ भंडारी यांनी त्यांना सांगितल्याचा दावाही राऊत यांनी केला. नरसिंग उदगीरकर यांना मंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी २५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या बदल्यात ५ कोटी रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यावर उदगीरकर यांनी आपण दलित समाजासाठी काम करत असून एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, पैसे दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला.
या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली होती. मात्र, विभागाकडून या संदर्भातील माहिती मंत्र्यांपर्यंत पोहोचल्याचा आणि त्यानंतरही त्यांनी पैसे घेतल्याशिवाय काम करणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचे आवाहन करत संजय राऊत यांनी नरसिंग उदगीरकर यांना समोर आणून त्यांची बाजू ऐकण्याची मागणी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावावर अशा प्रकारे पैशांची मागणी होत असेल, तर हे गंभीर असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मात्र, या आरोपांवर संजय शिरसाट यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post