मुंबई । 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचे विशेष सरकारी वकील आणि विद्यमान खासदार उज्ज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्त यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, संजय दत्त यांनी योग्य वेळी पोलिसांना माहिती दिली असती, तर 1993 मधील भीषण मुंबई बॉम्बस्फोटांचा कट उधळून लावता आला असता आणि अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले असते.
एका मुलाखतीत बोलताना निकम यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटांपूर्वी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे घेऊन आला होता. या शस्त्रांमध्ये एके-47 रायफल्स आणि हँड ग्रेनेड्सचाही समावेश होता. त्यापैकी काही शस्त्रे संजय दत्त यांच्याकडे ठेवण्यात आली होती, तर काही नंतर परत करण्यात आली होती.
निकम यांच्या म्हणण्यानुसार, संजय दत्त यांना या शस्त्रांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले असते, तर तपास यंत्रणांना कटाचा मागोवा घेणे शक्य झाले असते. त्यामुळे स्फोटांचा कट आधीच उघडकीस येऊन आरोपींवर कारवाई करता आली असती, असा त्यांचा दावा आहे.
यावर पुढे बोलताना निकम म्हणाले की, संजय दत्त यांच्याकडे हा कट रोखण्याची संधी होती. त्यांनी वेळेत माहिती दिली असती, तर मोठी जीवितहानी टाळता आली असती. त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, याचवेळी निकम यांनी एक महत्त्वाची बाबही स्पष्ट केली. “संजय दत्त कोणताही दहशतवादी नव्हता आणि त्याचा दहशतवादी हल्ला करण्याचा हेतू नव्हता. त्याला शस्त्रांची आवड होती. त्याच निष्काळजीपणामुळे तो या प्रकरणात कायदेशीर अडचणीत सापडला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार’ या आगामी चित्रपटात अभिनेता राजकुमार राव त्यांची भूमिका साकारत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने निकम यांची ही मुलाखत आणि त्यातील वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली आहेत.














Discussion about this post