मुंबई । राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांची सुरू असलेली पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेदरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. छाननीनंतर ९२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला सुमारे ८० लाख लाभार्थी अपात्र ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष छानणीनंतर हा आकडा अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे.
योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी आणि पात्रतेची तपासणी सुरू केली होती. या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे न सादर करणाऱ्या किंवा ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांचे हप्ते थांबविण्यात आले आहेत. तसेच योजनेतील इतर पात्रता निकषांचीही तपासणी करण्यात आली.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी अपात्र
छानणीदरम्यान अनेक जिल्ह्यांतील महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. चुकीच्या पद्धतीने कोणाचे नाव वगळले गेले असल्यास त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी केली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्पन्न, वय आणि ई-केवायसीमुळे अनेक जण अपात्र
छानणीत सुमारे १२ लाख लाभार्थी महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे आढळले. तसेच ४.५ लाखांहून अधिक महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे त्या योजनेसाठी अपात्र ठरल्या. याशिवाय ई-केवायसी पूर्ण न करणे आणि इतर पात्रता निकष पूर्ण न करणे, हीही नावे वगळण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
१४ हजार पुरुषांचे अर्जही बाद
छानणीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुमारे १४ हजार पुरुषांनीही अर्ज केल्याचे आढळून आले. पडताळणीनंतर हे सर्व अर्ज अपात्र ठरवून संबंधितांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.दरम्यान, ज्या पात्र महिलांची नावे चुकून वगळली गेली असतील, त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.















Discussion about this post