रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) NTPC पदवीपूर्व भरती २०२६ संदर्भातील संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेत विविध रेल्वे झोनमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीतील एकूण १,६८८ पदे भरली जाणार आहेत.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून उमेदवारांना १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीची सविस्तर अधिसूचना १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?
RRB NTPC पदवीपूर्व भरतीमध्ये चार पदांचा समावेश आहे. त्यामध्ये ट्रेन्स क्लर्कची १८८, कमर्शियल कम तिकीट क्लर्कची ७००, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टची २०० आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची ६०० पदे आहेत. अशा प्रकारे एकूण १,६८८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
कमर्शियल कम तिकीट क्लर्क पदासाठी सुरुवातीचे वेतन २१,७०० रुपये, तर ट्रेन्स क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी सुरुवातीचे वेतन १९,९०० रुपये आहे. याशिवाय सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार लागू वेतन आणि भत्ते मिळणार आहेत.
१२वी उत्तीर्ण उमेदवार पात्र
या भरतीसाठी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये संगणक टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे.
१ जानेवारी २०२७ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असणे अपेक्षित आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
उमेदवारांना RRBच्या अधिकृत अर्ज पोर्टलवर किंवा संबंधित प्रादेशिक RRBच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करताना प्रथम नवीन नोंदणी करून त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर वैयक्तिक, शैक्षणिक माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये, तर एससी, एसटी, माजी सैनिक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क आहे.
दोन टप्प्यांत होणार CBT परीक्षा
निवड प्रक्रियेत प्रथम CBT-1 आणि त्यानंतर CBT-2 परीक्षा घेतली जाईल. टायपिंगशी संबंधित पदांसाठी उमेदवारांना टायपिंग कौशल्य चाचणीही द्यावी लागेल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.
CBT-1 मध्ये १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा वेळ असेल. यात सामान्य ज्ञानाचे ४०, गणिताचे ३० आणि सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्तीचे ३० प्रश्न असतील. CBT-2 मध्ये १२० प्रश्न असतील. यामध्ये सामान्य ज्ञानाचे ५०, गणिताचे ३५ आणि तर्कशक्तीचे ३५ प्रश्न विचारले जातील.
दोन्ही परीक्षांमध्ये चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी एक-तृतीयांश गुणांची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्जाच्या तारखा आणि सविस्तर अधिसूचनेतील पात्रता व इतर अटी काळजीपूर्वक तपासून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post