मुंबई : इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि पक्षाचा हिंदी चेहरा म्हणून ओळखले जाणारे आनंद दुबे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीत एकजुटीची चर्चा सुरू असतानाच दुबे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजीनाम्यानंतर आनंद दुबे यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर मतभेद असू शकतात; मात्र राष्ट्रहित सर्वोपरी असले पाहिजे, अशी भूमिका मांडली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी त्या काळातील आपल्या भेटीचा अनुभव सांगितला. दुबे यांच्या म्हणण्यानुसार, २६ एप्रिल रोजी त्यांनी पक्षाचे सहकारी आणि विधिमंडळ शाखेचे उप-संघटक गुलाबचंद मौर्य यांच्यासोबत पहलगाम परिसराला भेट दिली होती. त्या वेळी गोळीबारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती होती, असे त्यांनी नमूद केले. या भेटीदरम्यान त्यांनी फारुख अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन आपल्या पक्षाचा पाठिंबा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

देशासमोर संकट उभे असताना ज्येष्ठ खासदार आणि आमदारांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करायला हवी होती, असे मत दुबे यांनी व्यक्त केले. आपण मोठे नेते किंवा नगरसेवक नसलो, तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित असून आपल्यात शिवसैनिकाची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
“देशासमोरील संकट हीच मुख्य बाब आहे. पक्ष आणि स्वतःचा विचार नंतर, पण देश आधी,” अशी ठाम भूमिका आनंद दुबे यांनी मांडली.
ठाकरे गटातील आनंद दुबे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महाविकास आघाडीत एकजुटीचे प्रयत्न सुरू असताना हा राजीनामा समोर आल्याने त्याचे राजकीय परिणाम काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दुबे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.















Discussion about this post