जळगाव । जळगाव शहरात घरफोडी करून रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. असमतखा इलियास खा कुरेशी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २८ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

शेख अनिस शेख चाँद (वय ३५, व्यवसाय मोबाईल रिपेअरिंग, रा. निसार कॉलनी, जळगाव) यांच्या घरात ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली होती. चोरट्याने घरातून चांदीचे पैंजण, सोन्याचे दोन पोत आणि चार हजार रुपयांची रोकड असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी शेख अनिस यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गेंदालाल मिल परिसरात संशयिताचा शोध घेत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून असमतखा इलियास खा कुरेशी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र सखोल चौकशीनंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
२८ हजारांची रोकड हस्तगत
पोलिसांनी संशयिताकडून २८ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच तपास पूर्ण करून संशयिताला अटक केल्याने जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीची चर्चा होत आहे.















Discussion about this post