जळगाव । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत बंडखोरीचे नाट्य आता अधिकच रंजक वळणावर आले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला आहे. या घडामोडीनंतर जळगावातही शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आपला अर्ज मागे घेतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रेश्मा काळे यांनी आपण निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रेश्मा काळे यांनी आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. त्या म्हणाल्या,”माझ्या पाठींबा देण्याबाबत आणि उमेदवारी माघारीबाबत सध्या बाजारात अनेक उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मी थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेनंतरच माझा अंतिम निर्णय घेईन. तोपर्यंत माझी उमेदवारी शंभर टक्के कायम राहणार आहे.”
रेश्मा काळे यांच्या या ठाम भूमिकेमुळे जळगावातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहे. महिलांना उमेदवारीत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याच्या नाराजीतून आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे रेश्मा काळे यांनी सांगितले. मतदारसंघात आपल्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांचा मोठा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
रेश्मा काळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आता मतविभागणीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता यावर थेट राज्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदे काय मध्यस्थी करतात आणि हा बंडखोरीचा तिढा सुटतो की महायुतीला जळगावात याचा मोठा फटका बसतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post