जळगाव । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि अत्यंत खळबळजनक घडामोड समोर आली आहे. नाशिकपाठोपाठ जळगावचाही पेच सुटला असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे, असा दावा भाजपचे ‘संकटमोचक’ नेते मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, या दाव्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेना (शिंदे गट) च्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे महायुतीच्या गोटात मोठी चिंता पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा काळे या आज सकाळपासूनच कोणाच्याही संपर्कात नाहीत. जळगाव येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सध्या संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत असून त्या घरी उपस्थित नाहीत, असे बोलले जात आहे. तसेच, त्यांचे सर्व मोबाईल फोनही बंद येत आहेत. नाशिकमधील बंडखोरी शमल्यानंतर रेश्मा काळे माघार घेतील अशी आशा महायुतीला होती; मात्र अंतिम टप्प्यात त्या नॉट रिचेबल झाल्याने जळगावमधील बंडखोरीचा पेच कायम असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच आपली भूमिका कमालीची आक्रमक ठेवली होती. “नाशिकमधील गुंतागुंतीमुळे आपल्याला जळगावातून अर्ज भरावा लागला. जर नाशिकच्या बंडखोरांनी माघार घेतली, तर आपणही विचार करू,” असे संकेत त्यांनी सुरुवातीला दिले होते.
मात्र, काल माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट ‘यू-टर्न’ घेतला. “आपल्याला मतदारसंघातून आणि विशेषतः महिला लोकप्रतिनिधींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की मी उमेदवारी मागे घेऊ नये. त्यांच्या भावनांचा आदर ठेवूनच काय तो निर्णय घेऊ,” असे म्हणत आपण शेवटपर्यंत ही लढाई लढण्यावर ठाम असल्याचा दावा त्यांनी केला होता.
महायुतीने या मतदारसंघातून भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष बंडखोरी केल्यामुळे ही निवडणूक आता थेट प्रतिष्ठेची बनली आहे.
राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की, रेश्मा काळे यांना केवळ शिंदे गटाचाच नाही, तर भाजपच्याही काही नाराज नगरसेवकांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळेच गिरीश महाजन यांनी जळगावचा तिढा सुटल्याचे सांगितले असले, तरी काळे यांच्या ‘नॉट रिचेबल’ होण्याने महायुतीच्या नेत्यांची धडधड वाढवली आहे.
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी ‘संकटमोचक’ गिरीश महाजन ही बंडखोरी शमवण्यात यशस्वी होतात की नंदकिशोर महाजन यांच्या अडचणी वाढतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post