नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने अप्रेंटिस भरती २०२६ अंतर्गत तब्बल ४९५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ११ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ८ वी, १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
तीन गटांमध्ये होणार भरती
भरतीसाठी पदांचे तीन गटांमध्ये विभाजन केले आहे. गट ‘अ’ मध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर आणि स्ट्रक्चरल फिटर या पदांचा समावेश आहे. या गटासाठी उमेदवारांचे वय १५ ते १९ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
गट ‘ब’ हा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, वेल्डर, सुतार, कोपा आदी तांत्रिक पदांचा समावेश आहे. या गटासाठी वयोमर्यादा १६ ते २१ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
तर गट ‘क’ मध्ये ८ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिगर आणि वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) या ट्रेडमध्ये संधी उपलब्ध असून वयोमर्यादा १४ ते १८ वर्षे आहे.
राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत
शासकीय नियमानुसार अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत मिळणार आहे. इतर राखीव प्रवर्गांनाही शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील.
तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया
भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. प्रथम संगणक आधारित परीक्षा (CBT) घेतली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून गुणवत्ता आणि पात्रतेनुसार ट्रेडचे वाटप केले जाईल. अंतिम टप्प्यात वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एएफसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया
उमेदवारांनी एमडीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून अर्जातील आवश्यक माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि लागू असल्यास ऑनलाइन शुल्क भरावे. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही भरती ८ वी, १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी क्षेत्रात करिअर घडवण्याची मोठी संधी मानली जात असून इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post