जळगाव : जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेला धक्का देणारा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक कारण उघड झाले आहे. कारागृहाच्या कंपाउंड वॉलवर चढून फटाके फोडणाऱ्या तरुणांनी आतमध्ये बंदिस्त असलेल्या खुनाच्या आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
२० ऑगस्ट रोजी काही तरुण जळगाव जिल्हा कारागृहाच्या कंपाउंड वॉलजवळ पोहोचले. यावेळी त्यांनी भिंतीवर चढून फटाके फोडले. विशेष म्हणजे या प्रकाराचा व्हिडिओही तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. व्हिडिओ समोर आल्यानंतर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली.
पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला. फटाके नेमके का फोडण्यात आले, याचा शोध घेत असताना कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या आकाश मुरलीधर सपकाळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सपकाळे याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर यापूर्वी एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दोघे पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी जिल्हा कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ दाखल करण्यात आला. बीएनएस कलम ३२६ अंतर्गत कारवाई करत विक्की गणेश शिंदे ऊर्फ छोटा माया आणि शुभम जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ फटाके फोडल्याने त्यातील ठिणग्या आवारात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे बंदीवान आणि कारागृह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. तसेच कारागृहातील मालमत्तेचे नुकसान होण्याचीही शक्यता होती. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओपुरती कारवाई न करता, या कृत्यामागील कारणाचा शोध घेतला. तपासातून खुनाच्या आरोपीच्या वाढदिवसाशी या प्रकाराचा संबंध असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.














Discussion about this post