रावेर । रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या किरकोळ वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्यासाठी आरोपीने मृतदेह नाल्याच्या काठावर नेऊन टाकला. मात्र, रावेर पोलिसांच्या वेगवान आणि तांत्रिक तपासामुळे संपूर्ण कट उघड झाला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल पोलिस मदत केंद्र अंतर्गत गारखेडा गावात रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. २१ जुलै रोजी रात्री उशिरा ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त केला जात असला तरी घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमेचे स्वरूप पाहता पोलिसांना घातपाताचा संशय आला.
गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. चौकशीत रामा बारेला आणि त्यांचा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे समोर आले. पोलिस तपासानुसार, २१ जुलै रोजी सायंकाळी आरोपी अनिल बारेला पुन्हा काकाशी वाद घालण्यासाठी त्यांच्या घरी गेला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने हातातील लाकडी काठीने रामा बारेला यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पुरावे लपविण्यासाठी अपघाताचा बनाव
खून केल्यानंतर आरोपीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. मृतदेह ओढत नेत जवळील नाल्याच्या काठावर टाकण्यात आला, जेणेकरून तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि तपासातील विसंगतींमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
कडक चौकशीत गुन्ह्याची कबुली
रावेर पोलिसांनी संशयित अनिल बारेला याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत त्याने जमिनीच्या वादातून काकाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे गारखेडा गावासह संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, किरकोळ कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.















Discussion about this post