रावेर । घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला गल्लीतून जाण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून रावेर शहरातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि यावेळी किरकोळ दगडफेक झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रावेर पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी रावेर पोलिसांनी दंगल, दगडफेक आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

नेमकी घटना काय?
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या घरात आजूबाजूच्या लहान मुलांनी घरगुती गणपतीची स्थापना केली होती. रविवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास गणेशमूर्ती विसर्जनासाठी लहान मुले रिक्षा (एमएच १९ एएक्स २५२३) मधून निघाली होती. रजा कॉलनी परिसरातून जात असताना दोन-तीन अनोळखी महिला रिक्षाजवळ आल्या. त्यांनी ‘आमच्या गल्लीतून जायचे नाही’ असे म्हणत रस्ता अडवला. यावेळी मिरवणुकीतील महिलांशी त्यांचा वाद झाला.
वाद सुरू असतानाच रजा कॉलनी परिसरातून आलेल्या काही जणांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रावेरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरी बोचरे, अमूल बच्छाव, उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली. तसेच फैजपूर येथील डीवायएसपी अनिल बडगुजर यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, घटनेत सुमारे ८ महिलांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.














Discussion about this post