नवी दिल्ली । देशातील रेशन कार्ड व्यवस्थेत पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) नोंदी अद्ययावत करण्यासाठी SMART-PDS अंतर्गत ‘Silent Ration Card’ आणि ‘Duplicate Beneficiary’ अशा प्रकरणांची तपासणी करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून नवीन SOP लागू होणार आहे.
या नव्या प्रक्रियेमुळे दीर्घकाळ रेशनचा लाभ न घेणारी तसेच एकापेक्षा अधिक ठिकाणी लाभार्थी म्हणून नोंद असलेली कार्डे तपासणीच्या कक्षेत येऊ शकतात. . मात्र १ ऑक्टोबरपासून सर्व रेशन कार्ड बंद होतील, असं अजिबात नाही. ही प्रक्रिया केवळ संशयित, निष्क्रिय किंवा डुप्लिकेट नोंदींची पडताळणी करण्यासाठी आहे.

सहा महिन्यांपासून रेशन न घेतल्यास तपासणी
गेल्या सहा महिन्यांपासून ज्या रेशन कार्डावर धान्याचा लाभ घेतलेला नाही, अशा कार्डांची तपासणी होऊ शकते. अशा कार्डांना ‘Silent Ration Card’ म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या ठिकाणी लाभार्थी म्हणून आढळल्यास ते ‘Duplicate Beneficiary’ प्रकरण मानून संबंधित नोंदींची पडताळणी केली जाईल.
कार्ड लगेच रद्द होणार नाही
तपासणीच्या यादीत नाव आल्यास संबंधित लाभार्थ्याचे रेशन कार्ड तात्काळ किंवा कायमस्वरूपी रद्द केले जाणार नाही. आपली ओळख आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी लाभार्थ्याला तीन महिन्यांचा कालावधी दिला जाऊ शकतो. या कालावधीत e-KYC, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच गरज भासल्यास प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी (Field Verification) केली जाऊ शकते.पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या रेशन कार्डाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

e-KYC बाकी असल्यास तातडीने पूर्ण करा
सरकारी माहितीनुसार, ३० जुलै २०२६ पर्यंत देशातील ९०.६४ टक्के लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे अद्याप e-KYC न केलेल्या रेशन कार्डधारकांनी ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.रेशन दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या ePOS मशीनद्वारे e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे कार्डधारकांनी आपल्या रेशन कार्डची स्थिती तपासून घ्यावी आणि e-KYC पूर्ण आहे की नाही, याची खात्री करावी.
दरम्यान, बराच काळ रेशनचा लाभ घेतलेला नसल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानदार किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संपर्क साधणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व रेशन कार्ड १ ऑक्टोबरपासून बंद होणार नसून, निष्क्रिय आणि डुप्लिकेट लाभार्थ्यांच्या नोंदी तपासण्यासाठी ही नवीन प्रक्रिया राबवली जाणार आहे.















Discussion about this post